इंदापूर, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) इंदापुरात आज ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकल्याची घटना घडली आहे. दरम्यान, ओबीसी एल्गार सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ही चप्पलफेकीची घटना घडली आहे.
तत्पूर्वी, गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी एल्गार सभेत जोरदार भाषण केले. या सभेनंतर ही घटना घडली. दरम्यान इंदापूरात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. तर त्याच्याच शेजारी दुधाला दरवाढ मिळावी, यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. आजची सभा संपल्यानंतर गोपीचंद पडळकर हे या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी जात होते. त्यावेळी मराठा आंदोलकांनी पडळकर यांना उद्देशून गो बॅकच्या घोषणा दिल्या. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक यांच्यात काहीशी बाचाबाची झाली. यादरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांच्या दिशेने चप्पल फेकल्याचा प्रकार घडला. त्यावेळी पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, ही चप्पलफेक आम्ही केली नसल्याचे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे. ही चप्पलफेक आम्ही केली नाही, तर ती त्यांच्याच माणसांनी केली असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे. तर या चप्पलफेकीच्या घटनेनंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही चप्पलफेक करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.