मुंबई, 10 जून: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील नरिमन पॉईंट ते हाजीआली या मार्गावरील बोगद्याचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सागरी किनारा मार्गाच्या नरिमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली. याप्रसंगी, या नेत्यांनी यांच्यासोबत विंटेज गाडीतून प्रवास करत नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंत तयार केलेल्या या बोगद्याची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1800150609204511152?s=19
दुसरा टप्पा पुढील महिन्यात सुरू
दरम्यान, सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला आहे. तर जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा दुसरा टप्पाही सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच हा बोगदा अत्यंत अद्ययावत पद्धतीने बांधण्यात आला असून अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
https://twitter.com/mieknathshinde/status/1800106884495790211?s=19
नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंतचा बोगदा आजपासून सुरू झाला असल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून 40 ते 45 मिनिटांचे अंतर अवघ्या 8 ते 10 मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. “मुंबई कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा असणारा प्रकल्प आहे. सध्या या प्रकल्पाचे 90 टक्क्यांपेक्षा पेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. तर या प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील कामे देखील सध्या वेगाने पूर्ण केली जात आहेत,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.