बारामती बाजार समितीमध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ

बारामती, 17 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये 15 ऑक्टोबर 2024 रोजी बारामती मुख्य आवारातील यांत्रिक चाळणी येथे हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ सभापती सुनिल पवार यांचे हस्ते करण्यात आला. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत हंगाम 2024-25 मध्ये मुग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू असुन 15 ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील मूग, उडीद, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही. अशा शेतकऱ्यांनी मुदतीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन बारामती बाजार समिती तर्फे करण्यात येत आहे.



ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे शेतमाल घेऊन येण्याची तारीख कळविण्यात येते. त्याच दिवशी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपला माल आणावा. पहिल्या दिवशी 6 शेतकऱ्यांचे 40 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. वाळलेला आणि स्वच्छ असलेला शेतमाल खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी यावेळी दिली.



याप्रसंगी मार्केटींग फेडरेशन पुणेचे जिल्हा पणन अधिकारी पवारसाहेब, बाबालाल काकडे, निरा कॅनॉल संघाचे चेअरमन सतिश भैय्या काकडे, सदस्य राहुल जगताप तसेच अधिकारी अमोल कदम, प्रशांत मदने आणि बाजार समितीचे सदस्य दत्तात्रय तावरे, विभाग प्रमुख सुर्यकांत मोरे उपस्थितीत होते. शासनाच्या या हमीभाव केंद्रावर शेतमाल देऊन शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *