बारामती, 02 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज बारामती येथे विविध विकासकामांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी बस स्थानक, अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस वसाहत, बऱ्हाणपूर येथे नवनिर्मित पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1763880436206317669?s=19
बारामतीतील इमारती विकासाचे मॉडेल: मुख्यमंत्री
यावेळी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. बारामतीत उभ्या राहिलेल्या या इमारती विकासाचे मॉडेल आहे. या इमारतीत कुठेही दर्जाशी तडजोड केली गेलेली नाही. पोलीस हे प्रत्येक परिस्थितीत काम करत असतात. त्यामुळे त्यांना चांगली घरे देणे गरजेचे आहे आणि ते काम बारामतीमध्ये झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
पोलीस विभागाला चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे वाटप
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस शिपाई श्रीकांत गोसावी, पोलीस हवालदार विश्वास मोरे तसेच जयश्री गवळी यांना सदनिकेच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तर पोलीस विभागाला चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले. सोबतच पुणे वन विभाग भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या संदीप सोनवणे, स्नेहल म्हेत्रे, संतोष रणशिंग यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वनरक्षक पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.