पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन; सागरी पूल वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबई, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक मधील कार्यक्रम आटपून मुंबईत दाखल झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि सर्वात लांब सागरी सेतू देखील आहे. हा पूल आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सागरी पुलावरून प्रवास केला.

https://x.com/ANI/status/1745755162231361905?s=20

मुंबई आणि नवी मुंबई अंतर कमी होणार!

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू हा पूल 17,840 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आला आहे. या पुलाची लांबी 22 किमी इतकी आहे. या पुलाचा भाग 16.5 किमी समुद्रावर आणि 5.5 किमी जमिनीवर बांधण्यात आला आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे आता मुंबई आणि नवी मुंबई मधील अंतर कमी होणार आहे.

 

एका टॅक्सीला 250 रुपये टोल निश्चित

या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापता येणार आहे. सोबतच यामुळे मुंबई ते पुणे आणि गोव्याला जाण्यासाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे. दरम्यान, या सागरी सेतूवरून प्रवास करण्यास दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच या पुलावरून प्रवास करताना एका टॅक्सीला 250 रुपये इतका टोल निश्चित करण्यात आला आहे. या सागरी पुलामुळे मुंबईच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *