बारामती, 02 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथे आज विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आले. यामध्ये बारामती येथे अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त अशा नवीन बस स्थानकाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
https://twitter.com/Info_Pune/status/1763828709826363722?s=19
बस स्थानकासाठी 50 कोटींचा खर्च!
बारामती शहरात अत्याधुनिक आणि सुसज्ज असे बस स्थानक उभारण्यात आलेले आहे. विमानतळाच्या धर्तीवर अतिशय सुंदर असे हे बस स्थानक बांधण्यात आले आहे. या वास्तूमुळे बारामती शहराच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे. त्यामुळे राज्यभरात सध्या बारामतीच्या या बस स्थानकाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, हे बस स्थानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून साकारण्यात आले आहे. जवळपास 50 कोटी रुपये खर्चून ही इमारत बांधण्यात आली आहे.
सोयीसुविधांनी परिपूर्ण असे बस स्थानक
बारामती येथील अत्याधुनिक बस स्थानक हे दोन मजली असून, ते राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक आहे. या बसस्थानकावर एका वेळेस 22 बस फलाटावर थांबण्याची सुविधा असणार आहे. तसेच बारामती येथील या बसस्थानकात एकावेळी 56 बस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय देखील केलेली आहे. याठिकाणी प्रवाशांसाठी प्रशस्त अशी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यांसारख्या अनेक सोयीसुविधा बारामतीतील या अत्याधुनिक बस स्थानकामध्ये असणार आहेत.