शिर्डी, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज (दि.26) शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते. नरेंद्र मोदी यांचे भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने शिर्डी परिसरातील काकडी विमानतळावर आगमन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. त्यानंतर मोदी यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
सदावर्तेंविषयी शिंदे गटाच्या आमदारांचे वादग्रस्त विधान
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या या दौऱ्यात सुमारे 7500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यावेळी मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे भाविकांच्या सुविधेसाठी बनविण्यात आलेल्या नवीन दर्शन रांग संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. या संकुलामुळे देश-विदेशातील भाविकांची मोठी सोय होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदनगरमध्ये निळवंडे धरणाचे जलपूजन करण्यात आले. हे धरण सुमारे 5177 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहे. या धरणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 180 हून अधिक गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांनी अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलच्या माता व बाल आरोग्य शाखेचे भूमिपूजन केले.
अग्निवीर अक्षयच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत
सोबतच त्यांनी कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे लाईन (186 किमी) आणि जळगाव ते भुसावळला जोडणाऱ्या 2 रेल्वे लाईनच्या विद्युतीकरणाचे उद्घाटन केले. त्यानंतर राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नमो किसान महासन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षाला प्रत्येकी 6 हजार रुपये मिळणार आहेत. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचे बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित केली. दरम्यान या कार्यक्रमानंतर पंतप्रधान गोव्याला रवाना होणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 37 व्या राष्ट्रीय खेळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
One Comment on “पंतप्रधान मोदींच्या हस्ते 7500 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन”