दिल्ली, 17 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. जामिनावर सुटल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या संदर्भात आम आदमी पार्टीच्या नेत्यांची आज (दि .17) केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत आम आदमी पक्षाच्या सर्व आमदारांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी पक्षाच्या नेत्या आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आतिशी या लवकरच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिसणार आहेत.
https://x.com/AHindinews/status/1835922893546660037?s=19
आतिशी यांच्या नावाला पसंती
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून आप नेत्या आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी आपच्या आमदारांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सोबतच या बैठकीत आतिशी यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली, याची माहिती आपच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आतिशी या अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू मानल्या जातात. सध्या आतिशी या केजरीवाल सरकारमध्ये दिल्लीच्या शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत.
केजरीवाल राजीनामा देणार!
तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना जवळपास 5 महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारा असल्याचे जाहीर केले होते. “मी 2 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी प्रत्येक घराघरात जाऊन रस्त्यावर जाईन आणि जोपर्यंत जनता निकाल देत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (दि.15) एका सभेत म्हटले होते. दरम्यान, अरविंद केजरीवाल हे आजच त्यांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.