दिल्ली, 17 जून: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना पक्षाचा 58 वा वर्धापन दिन येत्या 19 जून रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा देखील आढावा घेण्यात आला. तसेच या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट उबाठा गटापेक्षा उत्तम होता, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार, असा खोटा नेरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
https://twitter.com/mieknathshinde/status/1802330320894894306?s=19
विधानसभेच्या तयारीला लागा
या लोकसभा निवडणुकीत झालेल्या चूका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागा, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यावेळी शिंदे यांनी 19 जून रोजीच्या वर्धापन दिनापासून पक्षाची सदस्य नोंदणी सुरू करणे, आपापल्या विभागात मतदारांची नोंदणी करून मतदार याद्या दुरूस्त करणे, शिवदूतांच्या नेमणुका करण्याला प्राधान्य देणे यांसारख्या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या सूचना यावेळी एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिल्या.
https://twitter.com/mieknathshinde/status/1802330433784529078?s=19
उबाठा पेक्षा जास्त स्ट्राईक रेट – शिंदे
“या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट हा उबाठा गटापेक्षा उत्तम होता. त्यांनी 22 जागा लढवून 9 जागा जिंकल्या तर आपण 15 जागा लढवून 7 जागा जिंकल्या आहेत. मुंबईत त्यांच्यापेक्षा 2 लाख जास्त मते आपल्याला मिळालेली आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छत्रपती संभाजीनगर आपण राखले असून, कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिलेली आहे. त्यामुळे जनता आपल्याला साथ देत असताना आता निर्माण झालेले चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागेल,” असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
ठाकरे आणि शिंदे गटाची कामगिरी
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाने 15 जागा लढविल्या होत्या. त्यातील छत्रपती संभाजीनगर, मावळ, कल्याण, ठाणे, बुलढाणा, हातकणंगले, मुंबई उत्तर पश्चिम या 7 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकूण 22 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पूर्व, नाशिक, हिंगोली, यवतमाळ, शिर्डी, धाराशिव, परभणी या 9 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.