पुणे, 26 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यात गुरूवारी (दि.26) वादळ आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
https://x.com/InfoDivPune/status/1839117071247921628?s=19
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी पुणे जिल्ह्यात दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालये यांना दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी बंद ठेवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालये यांना गुरूवार, दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असे आदेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
https://x.com/mybmc/status/1838976449870709241?s=19
येथील शाळांना ही सुट्टी जाहीर
यासोबतच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा आणि कॉलेजला आजच्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आजच्या (दि.26) दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.