अमरावती, 26 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील आठ मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. यामध्ये अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, नांदेड, हिंगोली, परभणी आणि यवतमाळ-वाशिम या जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 56.66 टक्के इतके मतदान झाले आहे.
#LokSabhaElections2024 । लोकसभा निवडणूक २०२४ – महाराष्ट्र दुसरा टप्पा
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 26, 2024
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान#ChunavKaParv #DeshKaGarv #IVote4Sure #Elections2024 pic.twitter.com/ObfkPeZkMr
महाराष्ट्रात कोणत्या जागेवर किती मतदान?
अमरावतीमध्ये 54.50 टक्के, बुलडाणा 52.24 टक्के, परभणी 53.79 टक्के, यवतमाळ-वाशिम येथे 54.04 टक्के, वर्धा 56.66 टक्के, नांदेड 52.47 टक्के, हिंगोली 52.03 टक्के आणि अकोला लोकसभा मतदारसंघात 52.49 टक्के इतके मतदान झाले आहे. या मतदानामध्ये, खासदार नवनीत राणा, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व जागांचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1783849720735019393?s=19
कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?
याशिवाय भारतात आज 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात लोकसभेचे मतदान झाले. यावेळी देशात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 65 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये केरळ 64 टक्के, त्रिपुरा 76 टक्के, उत्तर प्रदेश 53 टक्के, जम्मू-काश्मीर 67 टक्के, मध्य प्रदेश 55 टक्के, महाराष्ट्र 53.51 टक्के, मणिपूर 76 टक्के, राजस्थान 59.19 टक्के, आसाम 70.66 टक्के, बिहार 53.03 टक्के, छत्तीसगड 72.13 टक्के आणि कर्नाटकात सरासरी 64 टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाची तयारी
दरम्यान, राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा येथील 8 मतदारसंघांमध्ये आज तब्बल 204 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यात यंदा 5 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानाप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तयारी केली होती. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देशातील सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती.