पुणे, 09 जून: (विश्वजीत खाटमोडे) मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यानंतर पुणे शहरात काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी शहरातील रस्त्यांना नद्यांचे रुप आल्याचे दिसून आले. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच पुण्यात काल वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. एकाच पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पावसाळी नाले सफाईचे काम अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनावर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले.
https://twitter.com/supriya_sule/status/1799474464339775864?s=19
सुप्रिया सुळे यांनी काय म्हटले?
“पावसाच्या एकाच तडाख्यात पुण्याच्या रस्त्यावर पाणी तुंबले. महापालिकांमध्ये प्रशासक आहेत. त्यांनी जुनमध्ये पावसाची शक्यता ध्यानात धरुन नालेसफाई करण्याचे आदेश देणे गरजेचे होते. पुण्याचे रस्ते ना रस्ते आज तुंबले आहेत. नागरीकांच्या घरात पाणी घुसले. याला जबाबदार महापालिकेचा बेजबाबदार कारभार आहे. जनतेने आपले म्हणणे मांडायला जायचे तरी कुठं? गेली दोन वर्षांपासून शहरात लोकनियुक्त महापालिका देखील अस्तित्वात नाही. शहराच्या दुर्दशेला शासन जबाबदार आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
https://twitter.com/supriya_sule/status/1799651038238331162?s=19
सुप्रिया सुळे यांची टीका
“पुणे शहराची जोरदार पावसामुळे अक्षरशः दैना उडाली आहे. शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग, धायरी, वडगाव व शिवणे परिसरासह शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. लगतच्या अनेक सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरले आहे. पावसाळा नुकताच सुरू झाला असून पुढचे दिवस पावसाचे असणार हे गृहित धरल्यास नागरिकांना किती त्रास सहन करावा लागेल याची कल्पना या आठवड्यातील पाऊस आणि नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवरुन लक्षात येते. चा नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर आवश्यक असणाऱ्या उपाययोजना केल्या नाहीत त्यामुळे हे पाणी तुंबले असे नागरीकांचे म्हणणे आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पुण्यातील या भागांत जोरदार पाऊस
दरम्यान पुणे शहरातील येरवडा, कोथरूड, नागपुर चाळ, दामोदर नगर, सिंहगड रोड, सावरकर भवन, शिवाजीनगर, तावरे कॉलनी, सहकार नगर, सेनापती बापट रोड, ई स्क्वेअर, गणेशखिंड रोड, भैरवनाथ मंदिर, कोंढवा खुर्द, संदेशनगर, मार्केटयार्ड, गुरुनानक डेअरी, कल्याणीनगर, सैनिकनगर, येरवडा, नवी पेठ, आईमाता मंदिर, सुखसागर नगर, पर्वती दर्शन, मामलेदार कचेरी, विमाननगर, दारुवाला पूल, रास्ता पेठ, महादेव मंदिर, एरंडवणा, ट्रेझर पार्क, पद्मावती, रेंजहिल चौक, खडकी, भवानी पेठ, खिलारेवाडी, एरंडवणा, जंगली महाराज रोड, पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, पवार वस्ती, लोहगाव, धानोरी, गोखलेनगर या भागांत काल मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.