मुंबई, 29 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सध्या लोकांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलीस देखील सतर्क झाले आहेत. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. थर्टीफर्स्टच्या रात्रीच्या जल्लोषासाठी होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुंबई पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1740733234278015276?s=19
मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्या होत असतात. नागरिकांना नववर्षाचे स्वागत सुरक्षितपणे करता यावे, म्हणून मुंबई पोलीस दलाकडून 22 पोलीस उप आयुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त, 2051 पोलीस अधिकारी, 11 हजार 500 पोलीस अंमलदार तसेच एसआरपीएफ प्लाटून , क्यूआरटी टीम, आरसीपी, होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तरी सर्व नागरिकांनी नियमांचे उल्लंघन न करता नववर्षाचे स्वागत उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे, असे आवाहन बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मद्यपींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार, 31 डिसेंबर रोजी राज्यातील दारूची दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करत असताना त्या दिवशी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत असते. तसेच या दिवशी जास्त दारूची विक्री झाल्यामुळे सरकारी तिजोरीत भर पडणार आहे. तर या मद्यपींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबईत पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.