बारामती, 07 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती पोलिसांनी शुक्रवारी (दि.06) शहरात रूट मार्च काढला. बारामती शहरात यंदाचा आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सण शांततेत पार पाडण्यासाठी आणि या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बारामती पोलिसांनी काल रूट मार्चचे आयोजन केले होते.
बारामती शहरात रूट मार्च
या रूट मार्च मध्ये बारामती शहर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बारामती शहरात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण शांततेत आणि आनंदात साजरा व्हावा, हा संदेश देण्याचा या रूट मार्च मागील उद्देश आहे. तसेच या कालावधीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासंदर्भात नागरिकांनी खबरदारी घेऊन शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता.
हा रूट मार्च बारामती पोलीस निरीक्षक नाळे आणि पोलीस उपनिरीक्षक घोडके यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी बारामती शहर पोलिसांच्या पथकाने पोलीस वाहनांसह शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर सायरन वाजवून मार्गक्रमण केले.