साताऱ्यात उदयनराजे भोसले 32 हजारांहून अधिक मतांनी विजयी

सातारा, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी 32 हजार 771 विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना पराभवाचा धक्का बसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, साताऱ्यातील जनतेने एक्झिट पोलचा हा अंदाज खोटा ठरविला आहे.

https://twitter.com/airnews_mumbai/status/1797992089156026708?s=19

मतदानाची आकडेवारी

या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले यांना 5 लाख 68 हजार 749 इतकी मते पडली. तसेच त्यांना 2 हजार 385 इतकी पोस्टल मते मिळाली. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना इतर उमेदवारांच्या तुलनेत 47.67 टक्के मते मिळाली. तर दुसरीकडे, या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना 5 लाख 36 हजार 475 इतकी मते मिळाली. तर त्यांना 1 हजार 888 इतके पोस्टल मतदान झाले. या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत 44.94 टक्के मतदान झाले. तर साताऱ्यात 5 हजार 476 लोकांनी नोटाचा पर्याय निवडला. यासंदर्भातील माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे.

उदयनराजेंनी राखला साताऱ्याचा गड!

दरम्यान, लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे साताऱ्यातून कोणाला उमेदवारी द्यावी? असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला होता. अखेर साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. तत्पूर्वी, गेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. त्यामुळे या निवडणुकीत उदयनराजे भोसले हे विजय मिळवणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. अखेर सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *