पुणे, 11 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात आज महायुतीच्या पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. हा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह महायुती आणि घटक पक्षांचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://twitter.com/mieknathshinde/status/1778432533304332361?s=19
अजित पवार काय म्हणाले?
या मेळाव्यातून अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित चारही मतदारसंघात काम केले पाहिजे. काही लाख कोटींची काम सुरू आहेत. पुण्यातील वाहतूक कोडी सोडवण्यासाठी मेट्रो कात्रज, हडपसर, वाघोलीला नेतोय. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असणे गरजेचे आहे,” असे अजित पवार यावेळी म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील चारही जागा जिंकणार – एकनाथ शिंदे
यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. “बूथचा कार्यकर्ता ते महापौर असा प्रवास करणाऱ्या मुरलीधर मोहोळ मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. त्यांना कुठला डाव कधी टाकायचा? हे सर्व माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय स्वार्थासाठी आखाडे बदलणारे पहिलवान टिकणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेली कामे आणि राज्य शासनाने केलेली कामे मतदारांपर्यंत पोहचवली आणि त्यांच्याशी नीट संवाद ठेवला तर ते नक्की आपल्याला मत देतील. प्रत्येक बूथ महत्वाचा असून विजय मिळवण्यासाठी प्रत्येक बूथ जिंकावे लागेल. लोकसभा निवडणुकीसाठी 45 हून अधिक जागा जिंकायच्या असून, पुणे जिल्ह्यातील चारही जागा जिंकेल,” असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन
या मेळाव्यात पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. “मी महापौर झाल्यावर कोरोनाचे संकट आले आणि जगच थांबले पण त्या काळात काम करायची खरी संधी मला मिळाली. लोकांसाठी काय आणि कसे काम करायचे असते? ते मला या काळात काम करताना शिकायला मिळाले. पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील रस्ते-उड्डाणपूल, मेट्रोचा विस्तार ही सर्व कामे केवळ राज्यात आणि देशात असलेल्या विकासाच्या विचारांच्या सरकारमुळे शक्य होत आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याला हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी काही दिवस मेहनत करायची आहे. कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळसाठी नाही, तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यरत राहावे,” असे आवाहन यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी केले.