नवनीत राणांच्या प्रचारसभेत तुफान राडा, खुर्च्यांची फेकाफेक

अमरावती, 17 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. अशातच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत तुफान राडा झाला आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांची काल (दि.16) रात्री अमरावती जिल्ह्यातील खल्लार गावात प्रचारसभा पार पडली. त्यावेळी नवनीत राणा या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी खल्लार गावात आल्या होत्या. ही सभा चालू असताना नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नवनीत राणा या थोडक्यात बचावल्या. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सध्या राज्याचे राजकारण तापले आहे.

https://x.com/ANI/status/1857990228834922626?t=kBVCC9ztc7qehLimDggtZg&s=19

सध्या परिस्थिती नियंत्रणात

या गावातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती अमरावती गुन्हे शाखेचे ग्रामीण पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी दिली आहे. सभेदरम्यान दोन गटात काही कारणावरून वाद झाला. यानंतर याठिकाणी मोठा गदारोळ झाला. नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. सध्या या गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच यासंदर्भात काही नवीन माहिती मिळाल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिकारी किरण वानखडे यांनी केले आहे.

अशी घडली घटना

दरम्यान, नवनीत राणा या काल रात्री दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रमेश बुंदिले यांच्या बाजूने प्रचार करण्यासाठी खल्लार गावात आल्या होत्या. त्यावेळी नवनीत राणा यांचे भाषण सुरू असताना काही जणांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यावरून दोन गटात वाद झाला. त्यावेळी जमावाने लोकांवर खुर्च्या फेकल्या. या घटनेत नवनीत राणा या थोडक्यात बचावल्या. तर या हल्ल्यात काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी 40 ते 50 अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. तर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *