माझी वसुंधरा अभियान- 2.0 मध्ये बारामती नगरपरिषद राज्यात तृतीय

मुंबई, 6 जूनः पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारा राज्यभरात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियान 0.2 च्या विजेत्यांचे बक्षीस वितरण जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 जुन 2022 रोजी पार पडले. नगर परिषद वर्गवारीमध्ये एकूण 5500 गुणांपैकी 4822 गुण मिळवून बारामती नगर परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. त्यामध्ये वसुंधरेतील पंचतत्वे पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाच तत्वामध्ये विविध घटक निहाय केलेल्या कामास गुंणांकन देऊन विजेते काढले गेले आहेत.

बारामती नगर परिषदेने पृथ्वी तत्वामध्ये इन्वोर्मेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या मदतीसह लोक सहभागातून शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. त्याचसोबत जुन्या शहरात अस्तित्वातील झाडांची, शहरातील बागांची निगा राखण्याचे काम नगर परिषदेच्या उद्यान विभागा मार्फत सुरू आहे. शहरात नवीन रोपवाटिका तयार करण्यात आल्या. वारसा वृक्ष गणना, वृक्ष गणना याकरिता शहरातील शैक्षणिक संस्थांची मदत घेऊन ही कामे करण्यात आली. घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस-वीज निर्मिती आणि कंपोस्ट खत बनविण्या करिता प्रणाली उभी करण्यात आली. सुका कचरा कचरावेचकांमार्फत विलगीकरण करून विविध खाजगी संस्थांना पुनःप्रक्रियेकरिता देण्यात येतो. शहरात खाजगी संस्थेमार्फत थेट नागरिकांकडून प्लास्टीक खरेदी करून ते पुनःप्रक्रियेसाठी पाठविण्यात येते, यासाठी शहरात विविध ठिकाणी संकलन बुथ लावण्यात येतात. शहर स्वच्छतेकमी चांगले योगदान देणाऱ्या नागरिकांचा स्वच्छतादूत म्हणुन सन्मान करण्यात आला.

जल तत्व अंतर्गत कऱ्हा नदी सुधार प्रकल्प आणि निरा डावा कालवा सुशोभीकरण ही कामे सुरू आहेत. त्याच सोबत अस्तित्वातील दोन्ही साठवण तलावांची वेळोवेळी स्वच्छता करणे, शहरातील विहीरींचे पुनर्जीविकरण आणि साफसफाईचे काम इतर अनुषंगीक कामे वसुंधरा अभियानामध्ये करण्यात आली.

अग्नि तत्वा अंतर्गत शासकीय इमारतींना सोलार लावणे, विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढविण्या करिता प्रचार प्रसिद्धी करणे सोलारवर अधारित चार्जिंग स्टेशन सुरू करणे, जुन्या मुर्क्युरी व हॅलोजन दिव्यांच्या जागी वीज बचत करणारे एलईडी दिवे लावणे, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढविण्या करिता प्रचार करणे आदी कामे करण्यात आली.

वायु तत्वा अंतर्गत शहरात वायु गुणवत्ता परीक्षण प्रणाली बसविण्यात आली. वायु गुणवत्ता निर्देशांक सुधारण्या करिता विविध उपाय योजना करण्यात आल्या. शहरात जीवाश्म इंधंनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करून सायकलींचा वापर वाढवण्या करिता संपूर्ण शहरातील मोठ्या रस्त्यांना सायकल ट्रॅक तयार करण्यात आला. बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून सायकलच्या वापरास प्रोत्साहन देण्याकरिता व्यापक जन सहभाग लाभला.

आकाश तत्वा अंतर्गत पर्यावरण संवर्धन कायदा जन जागृती, विविध स्पर्धा आयोजित करणे इवेंट घेणे, पर्यावरण संवर्धंनाच्या उपक्रमात शाळा महाविद्यालये यांच्या सहकार्याने व्यापक स्वरुपात जनजागृती करून लोक सहभाग मिळविणे ही कामे करण्यात आली. पर्यावरण संवर्धनात विशेष योगदान देणार्याक नागरिकांचा पर्यावरण दूत म्हणुन सन्मान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानातील पंच तत्वांचा जास्तीत जास्त प्रचार करण्याकरिता पंचतत्व दर्शविणारे आकर्षक प्रचारस्थळे निर्माण करण्यात आली. ही प्रचार स्थळे शहरातील नागरिकांच्या आकर्षनाचा केंद्र बिंदू ठरत आहेत.

चालू वर्षात मिळालेल्या परितोषिकाने पुढील वर्षात माझी वसुंधरा अभियानात काम करण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळाली आहे. शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यास पुढील वर्षीचे माझी वसुंधरा अभियान एक चळवळ होऊन बारामती नगर परिषद या वर्षी पेक्षा चांगली कामगिरी करू शकेल असा विश्वास मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *