कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा 10 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार – मनोज जरांगे पाटील

रायगड, 31 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे. सगेसोयऱ्यांवरून सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई झाल्यास पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते रायगड येथे बोलत होते. त्यांच्या या घोषणेमुळे राज्य सरकारचे पुन्हा एकदा टेन्शन वाढले आहे.

https://twitter.com/ANI/status/1752638723106459706?s=19

चारच दिवसांपूर्वी सोडले होते उपोषण!

दरम्यान मनोज जरांगे यांनी 27 जानेवारी रोजी आपले उपोषण मागे घेतले होते. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र संदर्भात सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सोडले होते. त्यानंतर मराठा समाजाने राज्यभरात आनंद साजरा केला होता. दूसरीकडे मात्र राज्यातील काही नेत्यांनी सरकारच्या या अधिसूचनेला विरोध केला होता. यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्या व्यतिरिक्त ओबीसी समाजातील अनेक नेत्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता.

अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करणार: जरांगे पाटील

अशातच जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आरक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मराठा समाजासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. सगेसोयऱ्याच्या या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावावे. सरकारने या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा, येत्या 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. पूर्ण आरक्षण मिळाल्यावरच मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानेन, असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *