मुंबई, 17 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. ही निवडणूक एकाच टप्प्यात आयोजित करण्यात आली आहे. ह्या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदार यादीत आपले नाव असणे बंधनकारक आहे. मतदार यादीत आपले नाव नोंदवण्यासाठी 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत शेवटची मुदत आहे. त्यामुळे 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही, अशा नागरिकांनी आपले नाव 19 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केले आहे.
https://x.com/CEO_Maharashtra/status/1846494737135530011?t=OVcAwqHwVv6nVES14v9MRQ&s=19
ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल
वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत आपल्या नावाची नोंदणी करू शकतात. मतदार यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या या https://voters.eci.gov.in/ वेबसाईटला भेट द्यावी. तसेच Voter Helpline या मोबाईल ॲपवरून देखील नागरिक मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकतात. त्यासाठी नागरिकांना फॉर्म 6 भरावा लागेल. या फॉर्ममध्ये नागरिकांनी स्वतःची अचूक माहिती भरावी आणि सोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर काही दिवसांत तुमचे नाव मतदार यादीत सामाविष्ट होईल. त्यासाठी येत्या 19 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे. त्यामुळे वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या ज्या नागरिकांचे मतदार यादीत नाव नाही, अशा नागरिकांनी आपले नाव नोंदवावे जेणेकरून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. याची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत राज्यात 288 मतदारसंघात मतदान असणार आहे. हे मतदान सुरळीतपणे आणि शांततेत पार पडावे, यासाठी निवडणूक आयोगाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.