बारामती, 18 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषिक 2024 या जागतिक स्तरावरील शेतीविषयक प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बारामती मधील कृषी विज्ञान केंद्र येथे 18 ते 22 जानेवारी पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत येथे सुरू असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि कर्नाटकचे कृषीमंत्री एन चेलुवरायस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
कृषी क्षेत्रात संशोधकांनी केलेले काम पोहोचवण्यासाठी कृषिक प्रदर्शन
यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना संबोधित केले. “कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने आणि कृषी विकास केंद्राच्या वतीने राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गेले काही वर्ष आपण हे कृषिक या ठिकाणी आयोजित करतो. शेतीच्या क्षेत्रामध्ये दुनियेत बदल होत आहेत. नवनवीन संशोधन होत आहे, या संशोधनाचा उपयोग शेती उत्पादनाच्या संदर्भात होत आहे आणि ते तुम्हा लोकांपर्यंत पोहोचायला हवे तोच खरा संशोधनाचा उपयोग आहे आणि म्हणून कृषिक सारखे कार्यक्रम हे संशोधकांनी केलेले काम पोहोचवण्यासाठी आणि तुम्हा लोकांना काय बदल होत आहेत, त्याचे वाचनाचे सूत्र काय आहे ? हे समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय आहेत,” असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची: शरद पवार
एकदा यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला की, या देशाचे शेतीचे प्रश्न काय आहेत आणि किती आहेत त्यांनी उत्तर दिलं की, 10 तोंडी रावण असतो तसे शेतीचे प्रश्न आहेत. तो एकच प्रश्न आहे असं नाही, पाण्याचा प्रश्न, जमिनीचा पोत कसा सांभाळायचा? कोणते बियाणे चांगले कोणते नकली? गुंतवणूक केल्यानंतर त्याला मिळणारी किंमत ही योग्य आहे का? शेतीचा धंदा आज गत कसा होत आहे? त्याबद्दलचे अनेक प्रश्न आणि या प्रश्नांची सोडवणूक करणे हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखे आहे. यात ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आहे आणि म्हणून विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते, पण अलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदललेला आहे. असे शरद पवार म्हणाले.
शेतकरी संकटात गेला तर सर्वांना उपाशी राहावे लागेल: शरद पवार
“दिल्लीमध्ये कधी-कधी पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारच्या माणसांबरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते आणि शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न हा मी उपस्थित केल्यानंतर मला बोलतात, काहीही सांगतात तुम्ही पिकवणारे आम्ही खाणारे; या देशात पिकवणारे किती आणि खाणारे किती ? याचा जर अंदाज घेतला, तर पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि मी सांगत होतो की, पिकवणारा हा जर कर्जबाजारी झाला, तो संकटात गेला तर, खाणाऱ्यांना उपाशी राहावे लागेल.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
शरद पवारांनी कृषिमंत्री असतानाचा एक प्रसंग सांगितला!
मला आठवतंय की, मी शेती खात्याचा केंद्रात मंत्री होतो, कांद्याच्या किमती वाढल्यात; पार्लमेंटचे हाऊस सुरू झाले आणि विरोधी पक्षाचे भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि घोषणा सुरू केल्या की, शरद पवार इस्तीफ़ा दो। स्पीकरने विचारलं काय आहे ? कशासाठी या घोषणाबाजी चालू आहेत? तर विरोधकांनी सांगितलं की, कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याला जबाबदार कृषिमंत्री आहे आणि म्हणून त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खुलासा करा, मी त्यांना सांगितलं की, रोजच्या खाण्यामध्ये तुमचा कांद्याचा खर्च किती आहे ? तांदूळ, डाळी, ज्वारी, तेल, तिखट या सर्वांचा खर्च असेल, परंतु यात कांद्याचा किती खर्च आहे ? आणि एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही, तर माणूस उपाशी राहिला असे होत नाही आणि म्हणून हा कांदा उत्पादक शेतकरी गरीब आहे आणि या गरीब शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळत असतील, तर लगेचच किमती थांबवण्यासाठी बंदी घाला ही मागणी मला मंजूर नाही. तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाहीतर काहीही करा, मी कांद्याची किंमत खाली येऊ देणार नाही, मी त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे त्यासाठी काहीही सहन करायला तयार आहे, शेवटी सर्वजण गप्प बसले आणि त्यांनी मान्य केले. असे शरद पवार यावेळी म्हणाले.