जालना, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणी लेखी उत्तर दिले आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी उत्तराबाबत मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास नकार देऊ शकत नाहीत, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे कबूल केले होते. देवेंद्र फडणवीस अशाप्रकारे त्यांचे वक्तव्य बदलत असतील तर त्याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
तत्पूर्वी, या लाठीचार्ज प्रकरणी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जालनाच्या अप्पर पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या लेखी उत्तरात दिली आहे. तर अंतरवाली सराटी लाठीचार्ज दरम्यान 79 पोलिस आणि 50 आंदोलक जखमी झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. याठिकाणी पोलिसांनी बचावात्मक बळाचा वापर केला होता. त्यामुळे आंदोलकांवरील गुन्हे तपासणी करूनच मागे घेतले जातील असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान मराठा आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलीसांनी याठिकाणी आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला होता. त्यामुळे राज्यभरात या घटनेचा निषेध करण्यात आला होता. या घटनेनंतर काही मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार यासंदर्भात कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.