50 नाही तर हा आत्मा 56 वर्षे महाराष्ट्रात फिरतोय, शरद पवारांनी मोदींना टोला लगावला

श्रीगोंदा, 09 मे: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील एका प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, स्वप्न पूर्ण न झाल्याने एक आत्मा महाराष्ट्रात भटकतोय. नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचा शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतला. 50 नाही, तर मला विधानसभेत येऊन 56 वर्षे झाली. त्यामुळे हा आत्मा 56 वर्षे महाराष्ट्रात फिरतोय. तेच 56 वर्षे हे शोधतोय की, या 56 वर्षांमध्ये मोदी सारखी कोणी व्यक्ती आली नव्हती, असे शरद पवार यावेळी म्हणाले. ते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका प्रचार सभेत बोलत होते.

50 नाही, 56 वर्षे!

“नरेंद्र मोदींचा विश्वास या गोष्टीवर नाही. ते काल इथे येऊन गेले. अनेक ठिकाणी जातात. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्यावर टीका टिप्पणी करतो. माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे”, असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे. “पण त्यांना दुसरं कोणी दिसत नाही. आज कुठेही जाईल त्या ठिकाणी बोलतात. ते बोलले की, महाराष्ट्रामध्ये गेली 50 वर्षे एक आत्मा हिंडतोय सगळीकडे. त्यांना मला सांगायचं आहे, की 50 नाही, तर मला विधानसभेत येऊन 56 वर्षे झाली. त्यामुळे हा आत्मा 56 वर्षे महाराष्ट्रात फिरतोय. तेच 56 वर्षे हे शोधतोय की, या 56 वर्षांमध्ये मोदी सारखी कोणी व्यक्ती आली नव्हती,” अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींना टोला लगावला.

शेतीचा प्रश्न काय सोडवला?

“आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या, आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले, आम्ही राजीव गांधी पाहिले, आम्ही नरसिंह राव पहिले, अनेकांबरोबर काम केलं. त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोणीतरी आत्मा आहे. त्याची चिंता मोदींना वाटते. तो आत्मा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल, त्यासाठी तो महाराष्ट्रात हिंडतोय. त्यामुळे या सगळ्यासंबंधी अधिक बोलण्याचं काम नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. “अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत, आत्ताच अनेकांनी सांगितलं. काय शेतीचा प्रश्न सोडवला? कांद्याबद्दल चर्चाच करायला नको. कसं काय असं करता येईल की गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी आणि महाराष्ट्राचा कांदा पाठवायला परवानगी नाही? कांदा हा जिऱ्हाईत शेतकऱ्यांचे पीक आहे. दोन पैसे त्या गरीब शेतकऱ्याला मिळतात आणि त्याला आधार द्यायची जबाबदारी सरकारची असते, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *