मुंबई, 23 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसीने 2023 चा सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडे सोपविण्यात आले आहे. या संघात भारताच्या 6 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी 2, तर न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा या संघात समावेश करण्यात आला आहे. दूसरीकडे मात्र, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांसारख्या संघातील खेळाडूंना आयसीसीने आपल्या संघात स्थान दिले नाही.
https://twitter.com/ICC/status/1749779141912596827?s=19
रोहित शर्मा कर्णधार असणार!
दरम्यान, आयसीसीच्या सर्वोत्तम वनडे संघात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची सलामीची जोडी असणार आहे. या संघात तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला संधी मिळाली आहे. त्याने 2023 च्या विश्वचषकातील निर्णायक सामन्यात भारताविरुद्ध अविश्वसनीय 137 धावांची खेळी केली होती. तसेच चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीला स्थान देण्यात आले आहे. विराटने या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 765 धावा केल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला संधी मिळाली आहे. त्याने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 552 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात अनुक्रमे 130 आणि 134 धावांची खेळी केली होती.
या संघात भारताचे 3 गोलंदाज आहेत
आयसीसीने आपल्या वनडे संघाच्या सहाव्या क्रमांकांवर दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर हेनरिक क्लासेन याला स्थान दिले आहे. तो या संघातील एकमेव विकेटकिपर आहे. तसेच सातव्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को जॅन्सनला संधी देण्यात आली आहे. या संघात आठव्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ॲडम झाम्पा असणार आहे. नवव्या क्रमांकावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. दहाव्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला स्थान देण्यात आले आहे. तर आयसीसीने आपल्या एकदिवसीय संघात अकराव्या स्थानी भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळाली आहे. मोहम्मद शमीने 2023 च्या विश्वचषकात सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या.
विश्वचषक विजेत्या कॅप्टनला संधी नाही
विशेष म्हणजे, आयसीसीने आपल्या वनडे संघात विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला संधी दिली नाही. त्याच्याऐवजी या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय सलामीवीर म्हणून दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी विकेटकिपर सलामीवीर क्विंटन डी कॉक याला देखील संधी मिळालेली नाही. त्याने या विश्वचषक स्पर्धेत 594 धावा केल्या होत्या. तसेच भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पण आयसीसीने आपल्या संघात घेतले नाही.