दुबई, 23 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (दि.23) झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 42.3 षटकांत 4 गडी गमावून 244 धावा करत हा सामना जिंकला.
https://x.com/BCCI/status/1893696906603495688?t=48quttMsKLOyY5dvlh0ksA&s=19
पाकिस्तान संघाची निराशाजनक कामगिरी
पाकिस्तानसाठी सौद शकीलने 62 धावा करत सर्वोत्तम योगदान दिले. तसेच कर्णधार मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 144 चेंडूत 104 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. तर बाबर आझम 23, सलमान आगा 19, तर इमाम-उल-हक 10 धावा करून बाद झाले. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे पाकिस्तानचा डाव अवघ्या 241 धावांत संपुष्टात आला. भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी कामगिरी करत 3 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्याने 2 विकेट्स, तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
विराट कोहलीचे दमदार शतक
प्रत्युत्तरात भारताचा कर्णधार रोहित शर्माने आक्रमकपणे डावाची सुरूवात केली. परंतु, संघाची 31 धावसंख्या असताना रोहित 15 चेंडूत 20 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. त्यावेळी गिल बाद झाला. शुभमन गिलने 52 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 128 चेंडूत 114 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने 67 चेंडूत 56 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामना जिंकण्यासाठी थोड्याच धावा हव्या असताना श्रेयस बाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्या 8 धावा, तर अक्षर पटेल 3 धावा करून नाबाद राहिला. दरम्यान, या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने 111 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. कोहलीचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वे शतक होते. तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हे त्याचे पहिले शतक होते. गोलंदाजीत पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अबरार अहमद आणि खुसदिल शाह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर?
या विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर फेकला जाण्याच्या मार्गावर आहे. आता सोमवारी (24 फेब्रुवारी) बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यावर पाकिस्तान संघाचे भवितव्य असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.