माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो – जितेंद्र आव्हाड

मुंबई, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात विविध आंदोलने केली जात आहेत. तसेच आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोबतच त्यांनी आव्हाड यांना अटक करावी, अशी मागणी देखील पोलिसांकडे केली आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. “माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो.” असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले आहेत.

ओघात बोलून गेलो

“मी कधीही इतिहासाचा विपर्यास करीत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे हे माझे काम नाही. पण काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात रामकृष्ण हरी म्हणतो. जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे.” असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी त्यांनी वाल्मिकी रामायणातील एक श्लोक दाखवला. “हा श्लोक मी वाचून दाखवत नाही कारण, मला हा वाद आणखी वाढवायचा नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले.

त्या वक्तव्याबद्दल मी खेद व्यक्त करतो

“मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. आजकाल अभ्यासाला महत्त्व नाही तर, भावनांना महत्त्व आहे. त्यामुळे माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. राम हा आम्हा बहुजनाचा आहे. तुम्ही आमच्या रामाचे अपहरण केले आहे. तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. जाती-पाती न मानणारा राम आहे. राम हा आमच्या हृदयात आहे, फक्त तोंडात नाही. जे सध्या राम-राम करतायेत त्यांना मला सांगायचंय, तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणूकीसाठी आणायचा आहे. आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तो हृदयातच राहील, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले आहेत.

रोहित पवारांच्या ट्वीटला उत्तर

तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करून वादग्रस्त वक्तव्य करण्याची गरजच नव्हती, असे म्हटले होते. “नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.” असे रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांच्या या ट्वीटला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. “रोहित पवार यांच्याबाबत मी काही बोलणार नाही. रोहित पवार काय बोलतात. याकडे मी लक्ष्य देत नाही. ते अजून लहान आहेत. त्यांची ही पहिली टर्म आहे.” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *