हैदराबादचा पंजाबवर 4 गडी राखून विजय, हैदराबादची दुसऱ्या स्थानी झेप!

हैदराबाद, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह हैदराबादचा संघ 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे. आता जर राजस्थान संघ आपला कोलकाता विरुद्धचा सामना जिंकू शकला नाही, तर हैदराबादचा संघ प्लेऑफचा पहिला सामना खेळण्यास पात्र ठरेल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जने पहिल्या डावात 5 गडी गमावून 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 19.1 षटकांत 6 गडी गमावून या लक्ष्याचा पाठलाग केला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने 28 चेंडूत सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. तर टी नटराजनने गोलंदाजीत 2 विकेट घेतल्या.

https://twitter.com/IPL/status/1792190057149067355?s=19

पंजाबचे हैदराबादला 215 धावांचे लक्ष्य

तत्पूर्वी या सामन्यात पंजाबने हैदराबादला 215 धावांचे लक्ष्य दिले होते. यामध्ये पंजाब कडून प्रभसिमरन सिंगने 45 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंग आणि अर्थव तायडे यांनी संघासाठी 97 धावांची भागीदारी केली. यामध्ये अथर्व तायडेने 27 चेंडूत 46 धावा केल्या. तसेच रिले रुसोने 24 चेंडूत 49 धावांची खेळी केली. याशिवाय, काही चेंडू शिल्लक राहिले असताना खेळण्यासाठी आलेला पंजाबचा कर्णधार जितेश शर्माने 15 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 32 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला हैदराबाद समोर 215 धावांचे लक्ष्य ठेवता आले.

अभिषेक शर्माच्या 66 धावा

पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. त्यांचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड हा डावाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीप सिंगच्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्माने राहुल त्रिपाठीच्या साथीने संघाचा डाव सावरला. यावेळी अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांच्यात 72 धावांची भागीदारी झाली. या सामन्यात अभिषेक शर्मा 28 चेंडूत 66 धावा करून बाद झाला तर राहुल त्रिपाठीने 18 चेंडूत 33 धावांचे योगदान दिले. ते दोघे बाद झाल्यावर हेनरिक क्लासेनने हैदराबाद संघाची धुरा सांभाळली. क्लासेनने 26 चेंडूत 42 धावांची खेळी केली. तसेच नितीश रेड्डीने 27 आणि अब्दुल समदने 11 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला 215 धावांचे लक्ष्य गाठता आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *