नवी दिल्ली, 16 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी देशात यंदाच्या पावसाळ्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. यंदा संपूर्ण देशात सरासरीपेक्षा 106 टक्के जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर आणि ईशान्य राज्यांच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
https://x.com/Indiametdept/status/1779801226030297237
यंदा सरासरीच्या 106 पावसाचा अंदाज
यंदा संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत देशात सरासरीच्या सुमारे 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये केवळ 5 टक्के पाऊस कमी-अधिक होण्याची अपेक्षा असल्याचे भारतीय हवामान विभागाने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, यंदाचा मान्सून पाऊस राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सध्या पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची टंचाई तसेच गुरांच्या चारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा अंदाज जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणत्या राज्यांत जास्त पाऊस?
उत्तर-पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, या राज्यांसह पुड्डुचेरी, अंडमान निकोबार द्वीप समूह, लक्षदीप, दादरा नगर हवेली, दमन-दीव या केंद्रशासित प्रदेशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.