पुणे, 11 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात येणार असल्याचे मला माहिती नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे निलेश लंके शरद पवार यांच्यासोबत येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Pune, Maharashtra | On Ajit Pawar faction leader Nilesh Lanke joining the Sharad Pawar faction, NCP (SCP) chief Sharad Pawar says, “I don’t react on speculations… We are not in the business of being in contact with other leaders but I know several leaders are not comfortable on… pic.twitter.com/4p93n4AFr9
— ANI (@ANI) March 11, 2024
शरद पवारांनी काय म्हटले?
यावेळी शरद पवार यांनी या विषयावर थेट भाष्य करणे टाळले आहे. निलेश लंके आमच्यासोबत येणार असल्याची बातमी मला तुमच्याकडूनच कळत आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. तसेच मी अशा प्रकारच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाही. अनेकांच्या अशा प्रकारच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत, अनेक जण इच्छूक आहेत. यासंबंधी माहिती तपासून, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार म्हणाले आहेत. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार?
तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, यासंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप कोणीही केलेली नाही.
अहमदनगर मधून निवडणूक लढवणार?
निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्यांना महायुतीमध्ये या मतदार संघात तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे काही दिवसांपासून निलेश लंके शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, निलेश लंके यांचा येत्या काही दिवसांत शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यास, येत्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके विरुद्ध सुजय विखे-पाटील अशी लढत झाली तर नवल वाटू नये!