मुंबई, 03 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याणचे पदाधिकारी महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यातच ही घटना घडली. या घटनेत हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
https://twitter.com/ANI/status/1753639341468069960?s=19
पोलीस ठाण्यातच घटना घडली होती
भाजपचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर भागातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याणचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. ही गोळीबाराची घटना काल रात्री घडली. एका जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली. तर इतर तिघांचा शोध सुरू आहे. याप्रकरणात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
जमिनीच्या वादातून केला गोळीबार!
उल्हासनगर येथील जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांना काल रात्री हिललाईन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यावेळी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान गणपत गायकवाड यांनी अचानकपणे महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या पार्श्वभूमीवर, ठाण्यातील उल्हासनगर आणि कल्याण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.