मुंबई, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. परंतु, ही सुट्टी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये यांनाच देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे.
https://x.com/ANI/status/1864246368996643059?t=R3H26QoViuNlt9E61iXBIg&s=19
सरकारकडून परिपत्रक जाहीर
“गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दरवर्षी अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी स्थानिक सुट्टी देण्यात येते. तर आता 2024 मध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.” असे राज्य सरकारने या परिपत्रकात म्हटले आहे.
लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल
दरम्यान, महापरिनिर्वाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी वर दरवर्षी देशभरातून लाखो भीम अनुयायी येत असतात. यावर्षी देखील महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर अनुयायांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
https://x.com/mieknathshinde/status/1863932198057033813?t=0WshwStvbiSWFhWysX_OkA&s=19
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या भीम अनुयायींसाठी प्रशासनाकडून भोजन, पाणी, पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या सुविधा पुरविताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आढावा बैठकीतून दिले आहेत.