कल्याण, 02 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील घाटकोपर परिसरात काही दिवसांपूर्वी लोखंडी होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर आता ठाण्यातील कल्याण परिसरात लाकडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या दुर्घटनेत 3 वाहनांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. कल्याणच्या सहजानंद चौकात शुक्रवारी (दि. 02) सकाळी 10.18 वाजता ही दुर्घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, हे होर्डिंग अंदाजे 20×15 फूट असल्याचे सांगितले जात आहे.
https://x.com/ANI/status/1819250650200658065?s=19
लाकडी होर्डिंग कोसळले
दरम्यान, कल्याणच्या सहजानंद चौकात आज सकाळी अचानकपणे लाकडी होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली आल्याने 3 गाड्यांचे नुकसान झाले आहे. होर्डिंग पडल्यानंतर येथील वाहतूक काही काळ खंडित झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हे पडलेले होर्डिंग रस्त्यावरून बाजूला हटविले. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, याची अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना झाली होती
तत्पूर्वी, मुंबईतील घाटकोपर परिसरात मे महिन्यात झालेल्या वादळी पावसात बेकायदेशीरपणे लावण्यात आलेले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत 17 जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. ही दुर्घटना पेट्रोल पंपावर घडल्यामुळे येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेले लोक या होर्डिंगखाली दबले गेले. या दुर्घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. याप्रकरणी हे बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचा मालक भावेश भिंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो तुरूंगात आहे.