पुणे, 11 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात आणखी एक हिट अँड रनची घटना घडली आहे. पुण्यात एका ऑडी चालकाने मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला धडक दिली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. रऊफ शेख असे या मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉय चे नाव आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात मध्यरात्री हा अपघात झाला. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून लगेचच पळ काढला. परंतु त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
https://x.com/ANI/status/1844650492837990411?t=CLOuCC6fFjo2ajJ2cd-GEQ&s=19
डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डिंगसमोर मध्यरात्री 1.35 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी मद्यधुंद असलेल्या या ऑडी चालकाने सर्वप्रथम एका दुचाकीला धडक दिली. ज्यावरील तीन जण खाली पडले त्यामुळे ते तिघे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर काही वेळातच या ऑडी कारने दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातानंतर हा तरूण गंभीर जखमी झाला. तेंव्हा या तरूणाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह होता.
फरार आरोपीला लगेचच अटक
या अपघातानंतर 34 वर्षीय आरोपी आयुष प्रदीप तायल फरार झाला होता. यावेळी पुणे पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. तेंव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना त्याच्या कारची ओळख पटली आणि त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला हडपसर भागातील त्याच्या घरातून अटक केली. याप्रकरणी त्याच्या विरोधात हडपसर परिसरातील मुंढवा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 105, 281, 125 (अ), 132, 119, 1 77, 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय म्हटले?
दरम्यान, आज पहाटे 1.30 वाजता ही घटना घडली. दुचाकीला धडक दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्याने जखमीला मदत केली नाही. त्यानंतर पोलिसांनी काही तासांतच त्याला अटक केली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिकपणे असे दिसते की या घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता. आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतो, असे पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.