मुंबई, 25 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाने जमीन मंजूर केला आहे. त्याची बाल सुधारगृहातून सुटका व्हावी, यासाठी या आरोपीच्या अल्पवयीन आरोपीच्या आत्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी करताना हायकोर्टाने त्याला जामीन दिला आहे. त्यामुळे पुण्यातील कल्याणी नगर येथील कार अपघातप्रकरणी आता वेदांत अग्रवाल या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका होणार आहे. त्याची सुटका करून त्याला त्याच्या आत्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
https://x.com/ANI/status/1805547328050544730?s=19
आत्याने याचिका दाखल केली होती
तत्पूर्वी, पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आत्याने हेबियस कॉर्पस याचिका दाखल करून त्याच्या सुटकेची मागणी केली होती. त्या याचिकेवर याच्याआधी 21 जून रोजी सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सदर याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज मुंबई हायकोर्टाने या अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचे निर्देश दिले आहेत.
22 मे रोजी बाल सुधारगृहात रवानगी
तत्पूर्वी, हा अल्पवयीन आरोपी या अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत वेगाने पोर्श कार चालवत होता. त्यावेळी त्याच्या कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना 19 मे रोजी घडली होती. त्यानंतर या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने त्याच दिवशी जामीन मंजूर करून त्याची सुटका केली होती. त्यावेळी या अल्पवयीन आरोपीला जामीन देताना रस्त्याच्या सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहावा लागेल, अशी अट कोर्टाने ठेवली होती. त्यामुळे कोर्टाच्या या निकालावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर यासंदर्भात वाद वाढत गेला. तेंव्हा पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला पुन्हा एकदा बाल न्याय मंडळासमोर हजर केले. त्यावेळी कोर्टाने या अल्पवयीन आरोपीची 22 मे रोजी बाल सुधारगृहात रवानगी केली. तेंव्हापासून तो बाल सुधारगृहात होता.