पुणे, 02 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील बावधन परिसरातील डोंगराळ भागात बुधवारी (दि.02) सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा सध्या पोलीस तपास करीत आहेत, असे पिंपरी चिंचवडचे पोलिस अधीक्षक विनयकुमार चौबे यांनी सांगितले आहे.
https://x.com/ANI/status/1841348018513322226?t=dCIjo4AEyY1_AIVgXm3hZA&s=19
तिघांचा मृत्यू
हे हेलिकॉप्टर खाजगी कंपनीचे असल्याची माहिती समोर आली आहे. बावधन परिसरातील डोंगराळ भागात आज सकाळी साडे सातच्या सुमारास हे हेलिकॉप्टर कोसळले. हेरिटेज एव्हिएशनचे हे खाजगी हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड हेलिपॅड बावधन येथून उड्डाण घेतल्यानंतर काही अंतरावरच लगेचच कोसळले. त्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली. या आगीत या हेलिकॉप्टर मधील लोक होरपळून निघाले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पायलट आणि अभियंत्याचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, दोन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या चार गाड्या हजर घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवून हेलिकॉप्टर मधील लोकांना बाहेर काढले. या अपघातामुळे हे हेलिकॉप्टर जळून खाक झाले आहे. दरम्यान, या हेलिकॉप्टरमध्ये अपघातावेळी किती प्रवासी होते? याची देखील माहिती अजून मिळाली नाही.
यापूर्वी पौड येथे हेलिकॉप्टरचा अपघात
पुणे जिल्ह्यातील मागील काही महिन्यातील हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 24 ऑगस्ट रोजी पुण्यातील पौड मधील एका गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले होते. तेंव्हा या हेलिकॉप्टरमध्ये 4 प्रवासी होते. या अपघातात त्यातील एक जण जखमी झाला होता. तो या हेलिकॉप्टरचा पायलट होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हे हेलिकॉप्टर एका खाजगी कंपनीचे होते. ते मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यावेळी हे हेलिकॉप्टर अचानकपणे पौड परिसरातील एका गावाजवळ कोसळले होते.