पुणे, 25 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरासह जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खडकवासला धरण परिसर, खेड, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज (दि. 25 जुलै) सुट्टी देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
https://x.com/Info_Pune/status/1816285987045089491?s=19
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालये आजच्या दिवशी बंद ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटले आहे. तसेच जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
येथील शाळांना सुट्टी जाहीर
त्यानुसार भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र तसेच शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्याना दिनांक 25 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आहे. तरी, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. तसेच आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.