येत्या 3 ते 4 तासांत मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, मुख्यमंत्र्यांनी दिले सतर्कतेचे आदेश

मुंबई, 21 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पुढील तीन ते चार तासांत ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच हवामान विभागाने आज मुंबईसह कोकणातील आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पावसाच्या परिस्थितीत एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे, नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

https://x.com/AHindinews/status/1814949828385714581?s=19

https://x.com/CMOMaharashtra/status/1814931672908833020?s=19

मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

तसेच प्रशासनाने हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घ्यावी. या माहितीनुसार प्रशासनाने नियोजन आणि व्यवस्थापन करावे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत.

https://x.com/airnews_mumbai/status/1814952182229180832?s=19

मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट

दरम्यान, हवामान विभागाकडून आज मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या अनेक भागांत आज सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. सकाळपासून नवी मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. गेल्या पाच तासांत येथे 83.38 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *