पुणे, 10 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील अनेक भागांत सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे उष्णता कमी होत आहे. मात्र त्याचबरोबर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुणे शहरात आज देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पुणे शहरातील बिबवेवाडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी, स्वारगेट यांसारख्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी साठले आहे. तसेच पिंपरी चिंचवड परिसरात देखील आज पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहर आणि परिसरात पाऊस पडला आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या घरात आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1788877009076072554?s=19
https://twitter.com/airnews_pune/status/1788914605361688726?s=19
कोल्हापूर नाशिक जिल्ह्यात पाऊस
यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारी अचानकपणे पाऊस पडला. कोल्हापूरच्या अनेक गावांमध्ये आज दुपारी ढग दाटून आले होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी कोल्हापूरच्या पारगाव, शिये, टोप, संभापूर यांसारख्या गावांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. याशिवाय नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागांत देखील आज जोरदार पाऊस पडला.
पुढील काही दिवस पावसाचे!
तत्पूर्वी, पुढील काही दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभाग व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यातच पुढील काही दिवस पाऊस पडणार असल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.