येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तसेच येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पडत असलेल्या पावसाने सध्या थोडी विश्रांती घेतली आहे. परंतु, सध्या अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

https://x.com/RMC_Mumbai/status/1810594510499631342?s=19

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

याशिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *