मुंबई, 08 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) येत्या 9 ते 11 मार्च दरम्यान मुंबईसह कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेचे माजी प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिली आहे.
कोकणात तापमान वाढीचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कालावधीत मुंबई आणि कोकणातील काही भागांत तापमान सामान्यापेक्षा जास्त राहील. तसेच, 8 आणि 12 मार्च रोजी कोकणातील जिल्ह्यात उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोबतच महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये बहुधा कोरडे हवामान राहील, असे सांगण्यात आले आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
या पार्श्वभूमीवर, राज्यातील नागरिकांना हवामान खात्याच्या सुचनांचे पालन करण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून भरपूर पाणी प्यावे. द्रवपदार्थांचा नियमित सेवन करावे. तसेच त्यांनी गरजेच्या कामाशिवाय उन्हात जाणे टाळावे. हलके आणि सुती कपडे परिधान करावे. या उन्हाळ्याच्या काळात विशेषतः वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि दीर्घ आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना करण्यात येत आहेत.