दिल्ली, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) येत्या 5 दिवसांत देशातील उत्तर-पश्चिम भागांत तसेच राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच येत्या शनिवारपासून पूर्व आणि मध्य भारतातही उष्ण वारे वाहू शकतात, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. राजधानी दिल्लीसाठी यंदाचा 16 मे हा दिवस सर्वाधिक उष्ण ठरला आहे. त्यानुसार कालच्या दिवशी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. तसेच दिल्लीत पुढील दोन दिवस तापमान यापेक्षा जास्त राहील. तर शनिवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.सोबतच वायव्य, मध्य, पूर्व भारत, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या अनेक भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान संस्थेने वर्तवली आहे.
https://twitter.com/ANI/status/1791014634096586928?s=19
दक्षिण भारतात मुसळधार पाऊस
तर दुसरीकडे, येत्या 22 मे पर्यंत देशाच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवस तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयातही सोमवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नैऋत्य मान्सून येत्या 3 दिवसांत अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि निकोबार बेटांवर पुढे सरकण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1791031527171854470?s=19
मान्सूनचे 31 मे रोजी केरळमध्ये आगमन
नैऋत्य मान्सून 31 मे च्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यानंतर मान्सून 15 जूनच्या आसपास संपुर्ण देशात पसरतो. यापूर्वी हवामान विभागाने देशात यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पेक्षा जास्त मान्सूनचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. यावर्षी सरासरी 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.