हाथरस चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 121 वर पोहोचला, जखमींवर उपचार सुरू

हाथरस, 02 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी एका सत्संग कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली. मदत आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 28 जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी बाबा नारायण हरी उर्फ साकार विश्व हरी भोले बाबा याच्या सत्संगाच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी लोक एकमेकांना तुडवत गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. या घटनेत दुर्दैवाने आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

https://x.com/ANI/status/1808335904177901760?s=19

फरार बाबाचा शोध सुरू

या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करणारा भोले बाबा फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. पण या बाबाचा अद्याप तपास लागलेला नाही. या अपघातानंतर भोले बाबा मैनपुरीतील बिछवान येथील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्ट आश्रमात पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आश्रमात छापा टाकला. परंतु पोलिसांना हा बाबा तेथेही सापडला नाही. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनस), 2023 च्या कलम 105, 110, 126(2), 223 आणि 238 अंतर्गत सत्संग कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री योगी आज हाथरसला भेट देणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज जखमी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसला जाणार आहेत. मुख्यमंत्री प्रशासनाच्या माध्यमातून क्षणोक्षणी घटनेची माहिती घेत आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाथरस दुर्घटनेतील पीडितांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये, तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

अशी घडली घटना

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, फुलराई मैदानावर उघड्यावर सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील 50 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. सत्संग संपताच भाविक पुढे आले आणि भोले बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी जमा झाले. त्यावेळी हे लोक एका खड्ड्यातून पुढे येत होते. सुरूवातीला धक्काबुक्की होऊन काही लोक या खड्ड्यात खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर जो खाली पडला तो उठू शकला नाही आणि गर्दी त्याच्या अंगावरून जात राहिली. त्यामुळे काही वेळातच मोठी दुर्घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *