हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

इंदापूर, 07 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) भाजप नेते आणि राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.07) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. तसेच यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी देखील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षात येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद आता वाढणार आहे. दरम्यान, इंदापूर येथे झालेल्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

https://x.com/supriya_sule/status/1843166376414117908?t=eQTmiStb77kgKoCoSKB3pA&s=19

https://x.com/Harshvardhanji/status/1843248348444180754?t=dBineUuCnHte7bCrjKRCdw&s=19

हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भूमिका व स्पष्ट केली आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले. आमच्यात अडीच तासांहून अधिक वेळ सविस्तर चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मला दुसरे काही पर्याय दिले. परंतु, हे पर्याय घेणे मला आणि माझ्या जनतेला शक्य होणार नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी म्हटले. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यात माझा अदृश्य हात होता, असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला. “सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत. ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चारवेळा खासदार झालात. तुम्ही खासदार होण्यामध्ये तीनवेळा आमचा प्रत्यक्षपणे थोडाफार सहभाग होता आणि कालच्या निवडणुकीमध्ये आमचा अदृश्य सहभाग होता,” असे विधान हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.

हर्षवर्धन पाटील विरूद्ध दत्तात्रय भरणे?

तत्पूर्वी, हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.04) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या विधानसभेला इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील विरूद्ध दत्तात्रय भरणे यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे राहतील. अशा परिस्थितीत इंदापूर मतदारसंघात येणारी विधानसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *