हर्षवर्धन पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

इंदापूर, 23 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हे गुरूवारी (दि.24) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूर मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इंदापूर येथील वाघ पॅलेस याठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

पाटील-भरणे तिसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी 7 ऑक्टोंबर रोजी भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून 1995, 1999, 2004 मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला. परंतु, त्यानंतर 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना पराभव पत्करावा लागला. या दोन्ही निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. तर आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे तिसऱ्यांदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंदापूरात तिरंगी लढत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. कारण, या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. इंदापूर मतदारसंघातून प्रविण माने यांनी त्यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. तसेच याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे इंदापूरातील या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे

प्रविण माने यांचा उमेदवारी अर्ज

तर दुसरीकडे प्रविण माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून प्रविण माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आता इंदापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा कोणाला होणार? आणि त्याचा फटका कोणाला बसणार? याची जोरदार चर्चा सध्या इंदापूर तालुक्यात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *