इंदापूर, 24 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.24) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूर मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, ॲड कृष्णाजी यादव उपस्थित होते.
https://x.com/Harshvardhanji/status/1849353694695014779?t=sKlB9bvQflk369l8NZzwBQ&s=19
https://x.com/supriya_sule/status/1849321292069278128?t=4YZTgtQfHqqJhQzs8kid9w&s=19
सुप्रिया सुळे यांची उपस्थिती
तत्पूर्वी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे औक्षण केले. याप्रसंगी, हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नीसह त्यांच्या कन्या अंकिता पाटील तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर शहरात रॅली पार पडली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रविण माने यांचा अर्ज दाखल
दरम्यान, महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय भरणे यांना इंदापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळणार असल्याचे कळल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशामुळे इंदापूर तालुक्यातील पक्षाचे अनेक नेते नाराज झाले आहेत. यामध्ये प्रविण माने यांनी बंडखोरी करीत इंदापूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रविण माने यांच्या उमेदवारीमुळे इंदापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पहायला मिळू शकते. दरम्यान, प्रविण माने यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका हर्षवर्धन पाटील बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतच्या चर्चा सध्या इंदापूर तालुक्यात रंगल्या आहेत. तसेच दत्तात्रय भरणे यांना देखील प्रविण माने यांच्या उमेदवारीचा फटका बसू शकतो, असेही काहीजण म्हणत आहेत. त्यामुळे प्रवीण माने यांची समजूत काढण्याचा दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केला जातो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.