दिल्ली, 30 मे: (विश्वजीत खाटमोडे) मान्सून बाबत आनंदाची बातमी आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे. याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरवर्षी केरळमध्ये 1 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यंदा दोन दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. दरम्यान, मान्सून केरळमध्ये पोहोचल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचायला त्याला आठ ते दहा दिवस लागू शकतात. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
https://twitter.com/ANI/status/1796052013052219550?s=19
https://twitter.com/ANI/status/1796053094347714565?s=19
केरळात पावसाला सुरूवात
दरम्यान, मान्सून दाखल झाल्यानंतर केरळमध्ये आज जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. सध्या केरळच्या अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मान्सूनने आज ईशान्य भारताच्या बहुतांश भागात प्रवेश केला आहे. याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, देशाच्या अनेक राज्यांत मान्सून पूर्व पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या पाच दिवसांत बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच येत्या चार ते पाच दिवसांत पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तपमानात घट होणार: आयएमडी
येत्या काही दिवसांत देशातील काही राज्यांच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात सुरू असलेली तीव्र उष्णता उद्यापासून हळूहळू कमी होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय जम्मू, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि ओडिशा येथे आजपर्यंत तीव्र उष्णतेची स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.