पुणे, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) हडपसर पोलीस तपास पथकाने नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 190 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत 1 लाख रुपये आहे. याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.
पोलीस तपास पथकाची कारवाई
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यावेळी तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांच्या नेतृत्वाखालील पथक हद्दीत गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून संशयित योगेश सुरेश राऊत (वय 25, रा. मोरेवस्ती, मांजरी बुद्रुक) आणि निसार चाँद शेख (वय 23, रा. शेख चाळ, हडपसर) यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून सुरूवातीला मॅफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 60 बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या.
190 बाटल्या जप्त
चौकशीत त्यांनी बेकायदेशीररित्या नशेसाठी या इंजेक्शनची विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोन आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी आणखी 130 बाटल्या लपवल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या बाटल्या जप्त केल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या आरोपींकडून एकूण या इंजेक्शनच्या 190 बाटल्या जप्त केल्या आहेत. त्याची अंदाजे किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. पोलिसांनी नागरिकांना अंमली पदार्थ किंवा बेकायदेशीर औषध विक्रीविषयी माहिती मिळाल्यास तत्काळ कळवावे, असे आवाहन केले आहे.
गुन्हा दाखल
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 123, 275, 278, 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडे कोणताही औषध विक्री परवाना नसून, त्यांनी कोणतेही औषध विषयक शिक्षण घेतलेले नाही. तरीही त्यांनी हे औषध बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवले होते. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, तसेच आरोग्यास हानीकारक ठरू शकते, हे माहित असून देखील, तरीही आरोपींनी नशेसाठी याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे.