दिल्ली, 18 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, ज्ञानेश कुमार हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानुसार 19 फेब्रुवारी 2025 पासून निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारतील. दरम्यान, ज्ञानेश कुमार हे सध्या निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांची ही नियुक्ती अधिनियम, 2023 च्या कलम 4 अंतर्गत करण्यात आली आहे. नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत.
https://x.com/ANI/status/1891550242316664963?t=7Nk-xzmdZdXeq2_RfgEirQ&s=19
विवेक जोशी निवडणूक आयुक्त
दरम्यान, दुसऱ्या अधिसूचनेत, कायदा आणि न्याय मंत्रालयाने नवीन निवडणूक आयुक्त म्हणून डॉ. विवेक जोशी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ते हरियाणा केडरमधील 1989 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हरियाणाचे मुख्य सचिव बनले. आता त्यांच्या जागी नवीन मुख्य सचिवाची नियुक्ती केली जाईल.
राजीव कुमार यांचा कार्यकाळ संपला
ज्ञानेश कुमार हे राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत. राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2025 रोजी संपणार आहे. राजीव कुमार 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून निवडणूक आयोगात रुजू झाले होते आणि 15 मे 2022 रोजी 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार घेतला होता. दरम्यान, निवडणूक आयोगात काम करत असताना राजीव कुमार यांनी अनेक नव्या उपक्रमांना चालना दिली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. याशिवाय जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुका यासारख्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही त्यांच्या कार्यकाळात झाल्या होत्या.