पुणे, 13 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) इलेक्ट्रिक साहित्याने भरलेला टेम्पो चोरून गुजरातमध्ये विक्रीसाठी नेणाऱ्या आरोपीला पुण्यातील विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 18.69 लाखांहून अधिक किमतीचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. विश्रांतवाडी पोलिसांच्या तत्परतेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरीचा माल हस्तगत करण्यात यश आले असून, पुढील तपास सुरू असल्याचे पुणे शहर पोलिसांनी सांगितले.
घटनाक्रम:
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, प्रशांत दिगंबर पाटील (रा. औरंगाबाद) याने हा गुन्हा केला असून, तो चोरी केलेला टेम्पो आणि त्यातील साहित्य गुजरातमधील भरुच येथे विक्रीसाठी घेऊन गेला आहे.
लाखोंचा मुद्देमाल जप्त
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या पथकाने भरूच येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला अटक करून 2.50 रुपये किमतीचा चोरलेला महिंद्रा पिकअप टेम्पो आणि 16 लाख 19 हजार 417 रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण 18 लाख 69 हजार 417 रुपये किमतीचा माल जप्त केला.
पुणे पोलिसांची यशस्वी कारवाई
ही कारवाई पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ 4) हिंमत जाधव आणि खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि गुन्हे निरीक्षक मंगेश हांडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या तपास पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. या कारवाईत पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर मुसारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.