महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे 170 संशयित रुग्ण, आरोग्य विभागाची माहिती

महाराष्ट्रात जीबीएस चे 225 संशयित रुग्ण

पुणे, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे संशयित रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली आहे, ज्यापैकी जीबीएसची 132 प्रकरणे निश्चित झाली आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने एका निवेदनातून दिली आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि इतर जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे. तर यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहेत. याव्यतिरिक्त, विभागाने सांगितले की बुधवारी (दि.05) राज्यात चार नवीन संशयित प्रकरणे आढळून आली आहेत.

https://x.com/ANI/status/1887345913288675784?t=MYpjF6KJzmxlY948TuGzdQ&s=19



आरोग्य विभागाने सांगितले की, “आतापर्यंत 5 संशयित रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. 170 संशयित रुग्णांपैकी 132 रुग्णांना जीबीएसची लागण झाली असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 33 रुग्ण, पुणे मनपा क्षेत्रात नव्याने समाविष्ट गावातील 86 रुग्ण, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 22 रुग्ण, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील 21 रुग्ण आणि इतर जिल्ह्यांतील 8 रुग्ण आहेत. या रुग्णांपैकी 62 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 61 रुग्ण आयसीयु मध्ये असून, त्यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.”

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी (दि.03) महाराष्ट्रातील प्रमुख आरोग्य आणि वैद्यकीय मंत्र्यांसोबत एक उच्चस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेतली, ज्यात राज्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) च्या वाढत्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलशक्ती मंत्री गुलाब रघुनाथ राव पाटील, राज्य आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जीबीस म्हणजे काय?

गिलियन-बार्रे सिंड्रोम हा एक ऑटोइम्यून स्थिती आहे. ज्यामध्ये आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच नर्व्हस सिस्टीमवर हल्ला करते. यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होते आणि स्नायू कमजोर होतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये, पक्षाघात देखील होऊ शकतो. जीबीएसची नेमकी कारणे अज्ञात आहेत, परंतु काहीवेळा ते व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होऊ शकते. ज्यामध्ये पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे आणि सुन्न होणे ही प्रमुख लक्षणे आहेत.

आरोग्य विभागाचे आवाहन

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी स्वच्छता राखावी. बॅक्टेरियाच्या संसर्गापासून स्वतःला दूर ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास बहुतेक लोक पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे याबाबत घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असे देखील आरोग्य विभागाने म्हटले आहे. जीबीएसची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *